Friday, March 19, 2010

मन कशात लागत नाही

मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा?
अज्ञात झर्‍यावर रात्री
मज ऐकू येतो पावा....

श्वासांचे तोडुन बंधन
हे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघून जाई....

सळसळते पिंपळपान
वार्‍यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी?

मन कशात लागत नाही...

मन बहरगुणांचे लोभी
समईवर पदर कशाला?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला

चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात
भर रस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरी घात....

मन कशात लागत नाही..

- कवी ग्रेस

No comments: