Friday, October 9, 2009

एक नॉस्तॅल्जिया आमचाही...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5103364.cms

नाशिक टाइम्स' हातात पडल्यानंतर सवयीप्रमाणे शिवाजी तुपे यांनी लिहिलेला नॉस्तॅल्जिया वाचायला घेतला. क्षणभर वाटलं आपणही नॉस्तॅल्जिया लिहिला तर? वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वषीर्च निवृत्तीचे वेध लागले का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण आजची 'जनरेशन नेक्स्ट' आणि पूूवीर्ची जनरेशन यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

कालपरवापर्यंत एसटीडीचे रेट कमी होतील म्हणून रात्री दहा वाजल्यानंतर टेलिफोन बुथमध्ये जाणारे आपण आज सर्रास मोबाईलशी खेळ खेळू लागलो आहोत. पेजर नावाचं उपकरण कधी बाजारात आलं आणि गेलं कळलंदेखील नाही. पत्रलेखन शेवटचं कधी केलं हे सुद्धा आठवेणासं झालं आहे. म्हणूनच तर हा 'नॉस्तॅल्जिया'.

आमच्या लहानपणी रामायण-महाभारत सांगणारे आजी-आजोबा नव्हते. कारण घरातली सगळी मंडळी रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा जे छोट्या पडद्यावर दाखवतील ते पाहण्यात रममाण असायची आणि आम्ही त्या कलाकारांचे अनुकरण करत ओस पडलेल्या रस्त्यांवर तिरंदाजी करत असायचो. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा मृत्यू असो किंवा किल्लारीचा भुकंप, यापेक्षा वेगळ्या ब्रेकींग न्यूज पाहिल्याचं आठवत नाही.

१९९३ साली शाळेला अचानक सुट्ट्या का मिळाल्या हे समजण्यासारखं ते वय नव्हतं. शाळेच्या आवारात एकच इंग्रजी माध्यमाचा वर्ग असायचा आणि फक्त त्यांच्यासाठीच बेंचेस असल्याने थोडीशी असुया वाटायचीच. (नवनिर्माणाचं वारं त्याकाळी वाहन नव्हतं, नाहीतर आम्हीसुद्धा सतरंज्याचा त्याग केला असता)

चंदकांता मधला कुरसिंग, जंगल बुक मधला शेरखान, अलिफ लैला मधले राक्षस या सर्वांची दहशत लहान वयात थोडीफार वाटायचीच. डकटेल्समधला अंकल स्कूज पाहण्यासाठी लवकर उठावं लागायचं. कारण कार्टुन पाहण्यासाठी पोगो, हंगामा, कार्टुन नेटवर्क एवढी २४ तास सेवा त्याकाळी नव्हती. यथावकाश माध्यमक्रांती झाली, ग्लोबलायजेशनची सुरुवात झाली आणि मग पाहता पाहता काळ झटकन निघून गेला.

शाळेत जाणाऱ्या श्रेया घोषाल, सुनिधी चौहानच्या जागेवर आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन दिसू लागल्या. सुरभीच्या पत्रांच्या जागी एसएमएसचे डोंगर दिसू लागले. चॅनेल्सच्या गदारोळात 'सॉरी शक्तीमान' म्हणण्याची निरागसता निघून गेली. कुलु-मनालीच्या रस्त्यावर गाणं गाणाऱ्या आपल्या चित्रपट नायकांची भरारी सातत्याने इंग्लंड-अमेरिकेच्या रस्त्यांवरच दिसू लागली.

जेव्हापासून क्रिकेट समजायला लागलं, तेव्हापासून डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सचिन तेंडूलकरनेसुद्धा कारकिदीर्ची दोन दशकं पार केली. सौरव गांगुली, अनिल कुंबळे तर एक कालखंड गाजवून निवृत्तसुद्धा झाले. डेव्हीड जॉन्सन, अॅबी कुरुविला या गोलंदाजांसाठी चॅरिटी मॅचेससुद्धा सुरू झाल्या.

स्टेफी ग्राफ-मोनिका सेलेस, आंदे आगासी-पीट सॅम्प्रस यांच्यातील थरारक लढती पाहता पाहता फेररर-नदाल, सेरेना-व्हिनसपर्यंत कधी येऊन पोहोचलो, समजलेच नाही.

आथिर्क उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, त्याकाळात टीव्हीवर सातत्याने अर्थमंत्री मनमोहनसिंग दिसायचे. हे दाढीवाले बाबा काय वाचतात ते लहानपणी समजलं नव्हतं. आज कॉलेजमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी मोठमोठ्या कंपन्या येऊ लागल्या. रिसेशन, बजेटसारखे शब्द कानावर पडू लागले, तेव्हा त्यातला 'अर्थ' समजू लागला.

मनमोहनसिंग आता पंतप्रधान झाले आहेत. र्वल्ड ट्रेड सेंटरच्या दुर्घटनेलाही आठ वर्षं होत आली आहेत. ज्या आमीर खान, अनिल कपुरचे चित्रपट पाहण्यासाठी लहानपणी रांगेत उभं रहावं लागायचं, त्यांच्याच मुला-मुलींच्या चित्रपटांसाठी आता कॉलेजला बंक मारावा लागतो आहे. खरच काळ किती बदललाय ना?

आज घरांतल्या सचिन तेंडूलकरच्या जुन्या पोस्टरवर धोनीचं पोस्टर दिसू लागलं आहे. बालचित्रवाणीऐवजी लहान मुलं 'बालिका वधू' पाहत असतात. 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' या गाण्याऐवजी 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' म्हटलं जातंय. त्यामुळे मन नॉस्तॅल्जिक होतं आणि मोबाईलमध्ये सेव केलेलं गाणं परत परत ऐकावसं वाटतं. गाण्याचे बोल असतात, 'जंगल जंगल बात चली है, पता चला है. चड्डी पहनके फुल खिला है फुल खिला है!'